नाशिक- कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी चार डॉक्टरांची टीम नियुक्त करण्यात आली असून जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूचा रुग्ण आढळल्यास त्यावर उपचार करण्यासाठी सज्ज आहेत, असे सिव्हिल सर्जन सुरेश जगदाळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
हेही वाचा- 'व्हॅलेंनटाईन डे'निमित्त मावळच्या गुलाबाची मागणी वाढली, १० दिवसात ८० लाखांचे उत्पन्न
कोरोना विषाणूने चीनमध्ये थैमान घातले असून यात शेकडो रुग्णांचा बळी गेला आहे. हा विषाणू इतर देशात पसरू नये यासाठी सगळ्याच देशांनी काळजी घेतली आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देणात येत आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात चार खाटांचा कक्ष तयार करण्यात आला आहे. यात दोन फिजिशियन, दोन एमडी सर्जन आणि दोन बालरोग तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय, खासगी वैद्यकीय संस्थांना कोरोना विषाणूबाबत माहिती व्हावी, त्यांची लक्षणे कळावी यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचे लक्षणे स्वाईन फ्लू आजाराशी मिळते जुळते असल्याने डॉक्टरांची गफलत होण्याची शक्यता असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. यासाठी ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, अद्याप नाशिक जिल्ह्यात चीनमधून कुठलाच प्रवाशी आला नाही, अशी माहिती सुरेश जगदाळे यांनी दिली.