नाशिक - कोरोनाच्या दुसर्या लाटेचा धोका लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा 4 जानेवारी, 2021पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. कोरोना व्यवस्थापन आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत, जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी सहभागी होते. जगभरात अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. नाशिक जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, दिवाळीनंतर पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या जिल्ह्यात 2 हजार 556 रुग्ण बाधित आहेत. शाळा सुरू करू नये, अशी पालकांची मागणी होती.
जिल्ह्यात आतापर्यंत 45 शिक्षकांना कोरोनाची लागण
डिसेंबर महिन्यात सुट्ट्यांमुळे 18 दिवस शाळा बंद असतील. त्यामुळे 9 दिवसांसाठी शाळा सुरू ठेवण्यात अर्थ नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 45 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात 37 तर शहरात 8 शिक्षक पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे नविन वर्षातच शाळ सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.