नाशिक - नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगडावर रविवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. प्रशासनाच्यावतीने या उत्सवासाठी पुर्वतयारी सुरू आहे.
उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत व साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगी गडावर लाखो भाविक येतात. या नवरात्रोत्सवात प्लास्टीक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मंदिर संस्थानच्या कार्यालयात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. नवरात्र काळात सर्व विभागांनी आपली जबाबदारी पार पाडावी अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यातील धरणातून विसर्ग वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
उत्सवकाळात दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या मदतीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना ट्रस्ट कार्यालयात करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षात सर्व विभागांचे प्रत्येकी एक अधिकारी 24 तास उपलब्ध राहतील.
नांदुरी येथे खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्रा काळात गडावर खासगी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मंदिर आणि शिवालय तलाव परिसरात आपत्ती व्यवस्थापन टीम कार्यान्वित असणार आहे.
हेही वाचा - पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; मग तिकीट वाटपाच्या चर्चा करा - भुजबळ
जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस अधीक्षक आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी पंकज आशिया, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक प्रशात खैरे, देवी संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी मंदिर परिसरातील तयारीचा आढावा घेतला.