नाशिक - राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना नाशिकमधून हद्दपार करा असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. भुजबळांनी आता संन्यास घ्यायला पाहिजे. सभा दिसली की त्यांना बळ येते आणि कोर्टाची तारीख आली की छातीत कळ येते असा टोलाही राऊत यांनी लगावला.
महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली. भुजबळांनी पंढरपूरची वारी न करता तुरुंग वारी भोगली आहे. अशांना नाशिककर मतदान करणार का ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. नाशिक मतदारसंघातून महायुतीचाच उमेदवार निवडून येईल असा दावाही संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केला.
नाशिकमध्ये तुरुंगवीर उभे आहेत. पण त्यांचा आत्ता पत्ताच नाही. तुरुंगातील भत्ता खाऊन जॉगिंग ट्रॅकवर फिरत ते वजन कमी करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. त्यांच्या आत्मविश्वासाला दाद द्यायला पाहिजे. अंधार समोर दिसत असतानाही युद्ध करायची ताकत शाहिस्तेखान आणि अफजलखानाला होती आणि त्यानंतर भुजबळ यांच्यात असल्याचा टोला त्यांनी लगावला. देशासाठी सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन संजय राऊत यांनी केले.