नाशिक - लोकसभा निवडणुकीचा कौल काल (२३ मे) जाहीर झाल्यानंतर राजकिय वर्तुळात कुठे निराशा तर कुठे जल्लोष पाहायला मिळाला. अशातच काही पक्षांनी आपले अपयश स्वीकारून पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची भूमिका घेतली आहे. या निकालानंतर 'नाशिक लोकसभा निवडणुकीत नाशिकरांनी दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारतो. या निकालामुळे आमच्या जनसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही', अशी प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नेहमीच जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही लढा दिला आहे. यापुढेही तो असाच अविरतपणे सुरू राहील. नाशिक शहर आणि जिल्ह्यात आम्ही अनेक विकासाची कामे केली आहेत. गेल्या ५ वर्षात विकासाची ही घौडदौड पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे नाशिकला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही नाशिक लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो. संयुक्त पुरोगामी आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन प्रचार केला. तसेच प्रत्येक गावागावात आणि खेड्या पाड्यावर जावून नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका मांडली. त्या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो.
लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. जनमताचा आम्ही आदर करतो आणि या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करतो. या पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पक्षाला नव्याने उभे करून जनतेच्या प्रश्नांसाठी लढा यापुढेही कायम ठेवू, त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
नाशिकमध्ये निवडणूक काळात शिवसेनचे उमेदवार हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ, भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे, आणि बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्यात चौरंगी लढत होती. मात्र, मतदानाच्या दिवशी शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे आणि खासदार समीर भुजबळ यांच्यात दुरंगी लढत झाल्याचे चित्र होते. नाशिकमध्ये खासदार रिपीट होत नाही असे म्हटले जायचे. मात्र, हेमंत गोडसे यांनी मागील निवडणुकीपेक्षा सर्वाधिक मताधिक्य घेत हा इतिहास मोडीत काढला आहे. तब्बल अडीच लाखाहून अधिक मतदानाची आघाडी घेत त्यांनी विजय संपादित केला आहे.