येवला ( नाशिक ) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भगव्यातून हिरव्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचा बोलवता धनी हा बारामतीला आहे, अशी टीका रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. तसेच, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नववा महिना लागला आहे की काय, असा निशाणाही खोत यांनी राष्ट्रवादी, काँग्रेसवर साधला आहे. ते येवला येथे आयोजित शेतकरी संवाद दौऱ्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलत ( Sadabhau Khot Criticizes Cm Uddhav Thackeray ) होते.
"मुख्यमंत्र्यांचा बोलवता धनी बारामतीत" - सदाभाऊ खोत म्हणाले की, मला वाटते की मुख्यमंत्री हे भगव्यातून आता हिरव्यात आलेले आहेत. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न बाळगलेले होते त्या स्वप्नाचा चक्काचूर करण्याचे काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यातील जनतेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत दिलेले होते. मात्र, विश्वास घात करुन ते सत्तेवर आले. त्यांच्या बोलवता धनी हा बारामतीला आहे. मुख्यमंत्री नामदार सारखे नामदारी आहेत. जसे एखादे बियाणे पेरल्यानंतर उगवते नसते तसे मुख्यमंत्री काही बोलले तर त्याला पीक येत नाही. त्यांच्या बोलण्याला काही सुद्धा अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांनी जरा घराच्या बाहेर पडावे. कोरोनाच्या काळात सुद्धा गावगाड्याचा माणूस शेतामध्ये राबत होता. तुम्ही मात्र अजून मास्क लावून आपल्याला काय होईल का?, झाले तर आपल्या संपत्तीचा काय करायचे या चिंतेने ते स्वतःची काळजी घेत आहेत, अशी टीकाही सदाभाऊ खोतांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला नववा महिना लागला" - राज ठाकरेंबद्दल बोलताना सदाभाऊ खोतांनी म्हटले की, राज ठाकरेंनी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लावा रे तो व्हिडिओ म्हणाले. हे जे सगळे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या टाळ्या वाजवत होती. आता त्यांनी तो व्हिडिओ बंद केला आणि गाडा रे यांना मातीत म्हटल्याबरोबर ते भाजप कडे निघाले लगेच अशा बोंब मारायला लागले. मग आता का पोटात कळा सुटायला लागल्या. तेव्हा हसू येत होते, आता काय नववा महिना लागला का म्हणून रडू येऊ लागले, असा टोलाही राष्ट्रवादी, काँग्रेसवर लगावला आहे.
"खाकी आणि खादीची युती" - राणा दाम्पत्यावरील दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत सदाभाऊ खोतांनी सांगितले की, ज्या पद्धतीने राजद्रोहाचा गुन्हा दाखल त्यांच्यावर केला. तो गुन्हा चुकीचा होता, असे न्यायालयाने सुद्धा स्पष्ट म्हटले आहे. न्यायालयाने शासनाला फटकारले या सरकारच्या विरोधात जर कोण बोलले, तर त्याला आम्ही तुरुंगात टाकून त्याच्यावर कोणत्या पद्धतीचे गुन्हे लावू. या राज्यांमध्ये खाकी आणि खादी या दोघांची युती झालेली आहे. त्यामुळे जनता आता सध्या वाऱ्यावरती आहे, असेही खोत यांनी म्हटले आहे.
"राज्याचे वाटोळे पवार अँड पवार कंपनीने केले" - राज्यात दूध, कांदा दर प्रश्न गंभीर झाला आहे. याकडे सरकार लक्ष देत नाही. सरकार सध्या बारामती वरून चालतेय. मराठा आरक्षण देखील बारामतीकरांनी घालवले. मराठा समजाचे वाटोळे या बारामतीकरांनी केले. राज्याचे वाटोळ या पवार अँड पवार कंपनीने केल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. तसेच, राज्याला आता पवार फॅमिलीपासून यांच्यापासून वाचवण्याची वेळ आल्याचा घणाघात खोत यांनी केला आहे.