नाशिक - सरकारी रुग्णालयावर लोकांचा विश्वास नाही. काहींना अनुभव आहे तर काही त्याबाबतच्या चर्चेमुळे तिथे जात नाहीत. सरकारी रुग्णालयाची आजची अवस्था फार वाईट नाही, तेथे देखील चांगले उपचार केले जातात. मात्र या रुग्णालयाची प्रतिमा बदलण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडलं.
आयुर्वेद व्यासपीठ संस्थेतर्फे उभारण्यात आलेल्या चरक भवन वास्तुचे डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. यावेळी कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना भागवत म्हणाले, आयुर्वेदामुळे उपचारासह विलंब लागतो, हा गैरसमज आहे.
प्राचीन आयुर्वेदशास्त्रात निरामय आरोग्याचा परिपूर्ण विचार केला आहे. त्यामुळे आयुर्वेदालाच पुढाकार घेऊन जगभरात सर्व पॅथीनमध्ये माहितीच्या आदान प्रदानासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही डॉ. भागवत यांनी सांगितलं.
दरम्यान काही दिवसांपूर्वी, भारतीय कोणत्याही धर्माचे असले तरी, त्या सर्वांचा डीएनए हा एकच असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं. सरसंघचालक मोहन भागवत यांनी गाझियाबाद येथे आयोजित राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या कार्यक्रमामध्ये डॉ. ख्वाजा इफ्तिकार अहमद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरण केले. यावेळी मोहन भागवत यांनी मॉब लिंचिंगच्या घटनांवरीही भाष्य केले. लिंचिंगमध्ये सहभागी असणारे लोक हे हिंदुत्वाच्या विरोधात आहे, असे ते म्हणाले होते. तसेच ‘भारतात इस्लाम धोक्यात’ या भयचक्रात मुस्लिमांनी अडकू नये, असेही भागवत म्हणाले होते.
भागवत यांच्या डीएनए आणि मॉब लिंचिंगच्या वक्तव्यानंतर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन औवेसी, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी सरसंघचालकांच्या विधानावर भाष्य केले होते. यात ओवैसी यांनी टि्वट करत म्हटलं की, हा द्वेष हिंदुत्वाची देण आहे. (लिंचिंग) हे गुन्हेगार हिंदुत्व सरकारच्याच आश्रयात आहेत.
हेही वाचा - दोनवाडे शिवारात बिबट्या जेरबंद; इतर बिबट्यांनाही जेरबंद करण्याची मागणी
हेही वाचा - शहरात पार्किंगची व्यवस्था नाही मग, कारवाई का? टोईंग कारवाईवर नाशिकरांची संतप्त प्रतिक्रिया