नाशिक - त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुकुल पीठात विश्वस्त, अध्यक्ष, संचालक व सदस्यांनी भाविकांच्या तब्बल 50 काेटी रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा धक्कादायक आराेप पुणे येथील एका वकीलाने केला आहे. या संदर्भात जिल्हा पाेलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार वकीलनाने न्यायालयासह, ईडी व सीबीआयकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अमर रघुनाथराव पाटील (७३, व्यवसाय वकीली, रा. करण लॅण्डमार्क, प्लॅट नं. १५, भावकर लेन, शिवाजीनगर, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुकुल पीठात विश्वस्त श्रीराम खंडेराव मोरे, नारायण दामोदर काकड, चंद्रकांत श्रीराम मोरे, नितीन श्रीराम मोरे, अनिल खंडेराव मोरे, शिरीष त्र्यंबक मोरे आणि निंबा मोतीलाल शिरसाठ(सर्व रा. दिंडोरी ता. जि. नाशिक) हे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक या संस्थेत विश्वस्त, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि उपसचिव व सदस्य कार्यरत असून त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, या संस्थेचे कामकाज स्वतःच्या स्वार्थाकरीता बेकायदेशीर पध्दतीने केले. संशयितांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता कटकारस्थान करून आणि फसवणुक करून संस्थेचा निधी राष्ट्रीयकृत बँकेत न ठेवता स्वतःच्या हातात ठेवल्याचे अर्जात नमूद केले आहे. दिनांक 1 जानेवारी 2020 ते 31 मे 2021 या आर्थिक वर्षाचे कालावधीमध्ये संस्थेच्या लेखापरिक्षण अहवालात स्पष्टपणे शेरा नमूद केला आहे आणि यावरून संस्थेत 5 हजार पेक्षाही जास्तीचा खर्च टेंडरविना करण्यात आल्याचे सिद्ध होते आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. संस्थेचे कामकाज करतांना संशयितांनी संस्थेची, शासनाची आणि भक्तांची फसवणुक करून सन 2009 ते 2021 पावेतो श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, धर्मदाय संस्थेच्या निधीचा दुरूपयोग करून रक्कम रूपये 50 काेटी 68 लाख 79 हजार 221 रुपयांचा अपहार केला आहे.
'पोलिसांनी कारवाई करावी' : त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुकुल पीठात विश्वस्त, अध्यक्ष, संचालक व सदस्य अल्पशिक्षित आहेत. यांना अध्यात्म माहित नाही, लाेकांना जादुटाेणा झाल्याचे सांगतात. खाेटे दावे करतात. संजीवनी बुटी वाटतात, पैसे घेतात, या सर्वांवर कठाेर कारवाई करावी. पाेलिस अधीक्षकांनी याची दखल घ्यावी. मी न्यायालयापर्यंत लढा देईन, असे तक्रारदार अमर पाटील यांनी म्हटले आहे.
अहवाल आल्यावर पुढची कारवाई : आम्हाला तक्रारदारकडून अहवाल प्राप्त झाला आहे. आम्ही तो अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला. ते याबाबत सखोल चौकशी करून आम्हाला अहवाल देतील त्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू, असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले आहे.