नाशिक - मनमाड शहरातील मुक्तांगण जिमखाना भागात ठिकाणी काल(17 नोव्हेंबर) रात्री चोरीची घटना घडली आहे. सिद्धांत शांतीलाल बाफना यांचे कुलुपबंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
बऱ्याच दिवसांपासून बंद असलेले चोऱ्यांचे सत्र शहरात पुन्हा एकदा सुरू झाले आहे. याप्रकरणी मनमाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मनमाड शहर परिसरात नागरिक आणि व्यापारी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आणि असलेले कॅमेरे सुस्थितीत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सुचवले आहे. नागरिकांनादेखील बाहेरगावी जाताना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करून जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.