नाशिक - गायीला हिंदू धर्मात मातेचं स्थान देण्यात आले आहे. यामुळे शेतकरी आपल्या गायीला आपल्या घरातल्या सदस्याप्रमाणे जपतात. याच गायीच्या पोटातून सोन्याची अंगठी मिळाल्याची घटना निफाडमध्ये घडली आहे. गाय चारा खात नसल्याने निफाडच्या वाघ कुटुंबीयांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली तेव्हा तिच्या पोटातून सोन्याची अंगठी त्यांना मिळाली.
वाघ कुटुंबियांना मिळालं हरवलेलं सोनं परत
हिंदू धर्मामध्ये गाईला मातेची उपमा दिली जाते. गाईपासून होणारे दूध उत्पादन हा शेतकऱ्यांचा शाश्वत व्यवसाय आहे. यातच शेतकरी म्हटले तर कोणत्याही जनावराला आपल्या घरातील सदस्यांपैकी एक समजून वागवले जाते. अशीच गाईची आपल्या घरातील सदस्याप्रमाणे सुश्रूषा करणाऱ्या निफाड तालुक्यातील कोळगाव येथील प्रगतशील शेतकरी विनायक वाघ यांची गाय काही दिवसांपूर्वी चारा खात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी जनावरांच्या डॉक्टरांना बोलवून तिची तपासणी करून घेतली. यावेळी गायीच्या पोटात लोखंड असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली, यामुळे तिची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया केल्यानंतर हरवलेली सोन्याची अंगठी गाईच्या पोटातून परत मिळाली आणि वाघ कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला.
शस्त्रक्रियेनंतर पोटातून निघाले बारीक खिळे,पत्रे,अंगठी
डॉक्टरांनी गाईची शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या पोटातून बारीक खिळे, पत्रे, अंगठीदेखील मिळून आली आहे. त्यामुळे गायीच्या आजारपणाच्या काळजीत असणाऱ्या कुटुंबीयांना गाय बरी होण्याबरोबरच हरवलेली सोन्याची अंगठी देखील परत मिळाली आहे. यामुळे वाघ कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.