दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील सुमारे 400 उत्तर प्रदेशमधील कामगार आपल्या गावी परतले असून दिंडोरी तालुका प्रशासनाने चोख नियोजन करत 20 बसद्वारे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर त्यांना पोहचविण्यात आले.
दिंडोरी तालुका प्रशासनाने प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार कैलास पवार, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांनी नियोजन करत तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात स्थलांतरित कामगारांची नोंदणी केली होती. नायब तहसीलदार सूर्यवंशी, तलाठी रोहिणी अळकुटे, सागर बोरस्ते यांनी दिंडोरी येथे नियोजन करत विविध गावात बस पाठविण्यात आल्या. त्यानुसार गुरुवारी मध्यप्रदेश मधील सुमारे दीडशे कामगारांना रवाना करण्यात आले तर शनिवारी दुपारी वीस बसमधून विविध गावात असलेल्या उत्तर प्रदेशमधील कामगारांना रवाना करण्यात आले.
यावेळी परप्रांतीय कामगारांनी महाराष्ट्र सरकारने दिलेल्या सुविधेबद्दल सरकारचे व अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्याचबरोबर कोरोनाचे संकट दूर झाले की, पुन्हा राज्यात येणार असल्याचे सांगितले. तालुक्यात असणारे बिहार व पश्चिम बंगालमधील कामगारांना अद्याप आपल्या राज्यात परतण्यासाठी प्रतीक्षा असून त्यांच्या राज्यात कधी गाडी जाणार याबाबत हे मजूर सरकारी कार्यालयात वारंवार विचारणा करत आहे.
अनेक कामगारांनी केला घरी जाण्याचा बेत रद्द -
दिंडोरी तालुक्यात सुमारे सहा सात हजार परप्रांतीय कामगार आहेत. त्यात अनेकांनी तहसील कार्यालयात गावी जाण्यासाठी नोंदणी केली होती. मात्र रेल्वेने जाणारे त्यात अत्यंत कमी आहेत. काही कामगार खासगी वाहनाने परत गेले आहेत. मात्र कंपन्या सुरू झाल्या असून आता लॉकडाऊन शिथिल होत विविध कामे सुरू होण्याचा अंदाज पाहता बहुतांश कामगारांनी गावी परतण्याचा आपला बेत रद्द केला आहे. आता कोरोनाचे संकट दूर होत असून नियमित रेल्वे सुरू होईल, तेव्हाच गावी परत जाण्याचा निश्चय केला आहे.