नाशिक - धार्मिक, आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र, लॉकडाऊन काळात नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला जवळपास 45 कोटींचा फटका बसला असल्याचा अंदाज आहे, असे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र करण्यात आलेल्या लॉकडाऊनला दीड महिन्याहून अधिक काळ झाला आहे. लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला असून धार्मिक पर्यटन क्षेत्रालाही या मोठा फटका बसला आहे. प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये जवळपास 45 कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे.
नाशिकच्या पंचवटी परिसरात लहान-मोठी 3 हजाराहून अधिक मंदिरं गोदावरी नदीच्या आजूबाजूला आहेत. या ठिकाणी धार्मिक विधी करण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येत असतात. या धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या साहित्याची देखील मोठ्या प्रमाणात उलाढाल होते असते. यासोबतच भाविकांची वाहतूक व्यवस्था, पुरोहित्य करणे, हॉटेल्स, गाईड, फुलांचा व्यवसाय यावरच अवलंबून आहे. मात्र, गेल्या दीड महिन्या पासून लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय ठप्प झाला आहे.
नाशिकच्या पंचवटी परिसरात 300 पुरोहित घराणे असून 1100 पुरोहित आहेत. नाशिकच्या प्रसिद्ध गोदावरी नदी तीरावर रोज गोदावरी तीर्थ यात्रा, गंगा पूजन, पितृ श्राद्ध, नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, दशक्रिया विधी, अस्थी विसर्जन, विविध यज्ञ पार पडत असतात या विधी करण्यासाठी संपूर्ण भारतातून भाविक नाशिकला येत असतात.