नाशिक - सध्या देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. याकाळात देशातील परिस्थिती अत्यंत बिकट असून, देशातील जनता मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. अशा वेळी मुस्लिम समाजाचा वर्षातील सर्वात मोठा सण रमजान ईद अर्थात ईद-उलफित्र येत आहे. यावर्षी ईद अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कुठल्याही प्रकारची नवीन खरेदी न करता गरीबांना मदत करून साजरा करण्याचे आवाहन मुस्लिम समाजातर्फे करण्यात आले आहे.अशा आशयाचा एक फलकच मशिदीबाहेर लावण्यात आलेला आहे.
कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे. अनेक देश कोरोनाच्या प्रादुर्भावाने पीडित असून, अनेक देशाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. देशात जवळपास दोन महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. अशा परिस्थितीत देशात रामनवमी, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यासह अनेक सण येऊन गेले. ते सर्व सण साधेपणाने साजरे करण्यात आले. आता येत्या 25 तारखेला रमजान ईद आहे. कोणीही सण साजरे केले नाहीत त्यामुळे आपणही ईद अगदी साध्यापणाने साजरी करावी, जास्तीतजास्त गरजू व गोरगरीबांना मदत करावी. कोणीही कपडे व इतर वस्तू खरेदी न करता या पैशातून होईल तेवढ्या लोकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा स्वरूपाचे फलकच मशिदीच्या बाहेर लावण्यात आले आहेत. यावर मुस्लिम समाजातील नागरिकांनी अंमल करावे, असेही सांगण्यात आले आहे.
आम्ही देशासोबत आहोत....
आम्ही भारतीय मुस्लिम असल्याचा आम्हाला अभिमान आहे. देशावर आलेले संकट हे दुर्दैवी आहे. आम्हीदेखील सरकारसोबत आहोत, भारतातील कोणताही मुस्लिम शासनाच्या निर्णयाविरोधात जाणार नाही. यावर्षी आम्ही ईद अगदी साधेपणाने साजरी करू, होईल तेवढ्या गरीबांना मदत करण्याचे आवाहन आम्ही केले आहे. मुस्लिम समाजातील नागरिक समजदार आहेत ते यावर अंमल करतील, असे मुस्लिम नागरिकांनी सांगितले.