नाशिक - कोणाला कशाचा छंद असेल याचा काही अंदाज लावता येता नाही. कोणाला तिकिटे गोळा करण्याचा छंद असतो, तर जुनी नाणी संग्रहित करण्याचा छंद तुम्ही पाहिला आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील गंगदेवी येथील राम उदावंत यांना चक्क चोरीला गेलेल्या वाहनांचा शोध लावण्याचा छंद आहे. त्याबरोबरच चोरीच्या वाहनांचा शोध लावून राम वाहनाच्या मुळ मालकापर्यंत वाहन पोहोचवतात. त्यामुळे त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
राम उदावंत अनेक वर्षांपासून चोरीला गेलेल्या गाड्या शोधण्याचा छंद जोपासत आहेत. त्यांना या कार्यात पोलिसांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. आत्तापर्यंत राम यांनी पुणे, नगर, बीड, मुंबई या शहरांमधील सर्वच पोलीस ठाणे फिरून ४ हजाराहून अधिक वाहनांचा शोध घेतला आहे.
राम उदावंत हे पोलीस ठाण्यामध्ये जाऊन चोरी झालेल्या आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहनांची चौकशी करतात. गाडीचा नंबर, चीसी नंबर हे सर्व घेऊन त्यावरून लिस्ट तयार करुन आरटीओ कार्यालयात जातात. त्यानंतर कोणती गाडी कोणाच्या नावे आहे, याची यादी घेतात. ज्या व्यक्तींच्या नावावर गाडी आहे, त्यांना आपल्या नावाने पत्र पाठवतात, की तुमची चोरीला गेलेली गाडी मिळाली आहे. गाडी घेण्यासाठी तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये या, असे सांगतात. त्यामुळे नागरिकांना त्यांची गाडी मिळते. त्यामुळे राम उदावंत यांची अनेक नागरिकांना चांगलीच मदत झाली आहे.
राम उदावंत हे आता नाशिकमध्ये त्यांचे हे काम करत आहेत. त्यांनी २ दिवसांत २५० मोटर सायकलच्या त्यांच्या मुळ मालकांचा तपास लावला आहे. या कामासाठी राम हे अनेक पोलीस ठाण्यात भटकंती करतात. त्यांच्या या कामात त्यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची मदत झाली आहे.