येवला (नाशिक) - येवला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हरणांसह अन्य वन्यप्राण्यांचा अन्न-पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या संख्येने हरणांची संख्या असल्याने वनविभागाने या परिसराला 'हरीणपार्क' म्हणून घोषित केले आहे. मात्र, पाण्याअभावी हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याने, अनेकवेळा कुत्र्यांचे हल्ले होऊन हरणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तालुक्यातील पूर्व भागात नुकत्याच जोरदार झालेल्या पावसाने वन परिसरातील नाले, ओहोळांना पाणी आले आहे. त्यामुळे हरीण, काळवीट यांना खाण्यासाठी चांगल्या प्रकारे पुरेशा प्रमाणात गवत उपलब्ध झाले आहे. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने हरणांना अन्न, पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच वनक्षेत्रातील डोंगराळ भागात ठिकठिकाणी पाणी साचले असून, वनविभागाने तयार केलेल्या वॉटर होलमध्येही पुरेसे पाणी साचल्याने हरणांच्या पाण्याची सोय झाली आहे.
तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, देवदरी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. याठिकाणी हरणांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे हिरवळ आली असल्याने या निसर्गरम्य ठिकाणी हरणांचा मुक्तसंचार आहे.