नाशिक - मुंबईच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी उद्या(मंगळवार) ५ तासांचा मेगाब्लॉक मध्य रेल्वेच्या वतीने घेण्यात येणार आहे. यामुळे मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेससह १६ मेल-एक्प्रेस ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर, कल्याण डोंबिवली दरम्यानची रेल्वे सेवा ५ तास बंद करण्यात येणार आहे. ऐन नाताळच्या दिवशी हा मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे ख्रिश्चन धर्मीय यांच्यासह अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर पादचारी पूलाचे गर्डर उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उद्या बुधवारी सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ पर्यंत ५ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक ही ५ तास पूर्णपणे बंद राहणार आहे. हा मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे १६ मेल व एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात, मनमाड-मुंबई व मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई व मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे व पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे व पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्प्रेस, दादर-जालना व जालना-दादर जनशताब्दी, सीएसएमटी-कोल्हापूर,कोल्हापू-सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस, सीएसएमटी-भुसावळ व भुसावळ-सीएसएमटी पॅसेंजर यासह इतर गाड्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये दामदुप्पटच्या नावाने लष्करी अधिकाऱ्यांना ४७ लाखांचा गंडा
या मेगाब्लॉकमुळे लोकल सेवेवर देखील परिणाम होणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. ऐन नाताळाच्या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तर, ख्रिश्चन धर्मियांनी देखील मोठी नाराजी व्यक्त करत रेल्वे प्रशासनाचा निषेध केला आहे.
रेल्वेच्या मेन्टेन्ससाठी नियमित साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात येत असतो. परंतु यावेळी रेल्वे प्रशासनाने २५ डिसेंबरला नाताळ सणाच्या दिवशीच सुट्टी असल्याने मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेकजण नाराज झाले असुन उद्या सणाच्या दिवशी ख्रिस्ती बांधवाना आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जाण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे, मनमाडसह नाशिक व उत्तर भारतातून मुंबईकडे जाण्याकरता उद्या गाडीच नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - शेतकरी जगवायचा असेल तर आयात थांबवा; कांदा उत्पादकांची आर्त हाक