नाशिक - येथील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने खासगी रुग्णालयातील कोविड कक्ष बंद करण्याचा निर्णय 'हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन'ने घेतला आहे. याबाबतचे निवेदन असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे. या निर्णयाने यापुढे खासगी रुग्णालयात कोविड रुग्ण दाखल केले जाणार नाहीत असं निवेदनात म्हटले आहे.
'८० टक्के बेड राखीव'
नाशिकमध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा तिप्पट रुग्णसंख्या वाढल्याने, सरकारी यंत्रणा अपुरी पडू लागली. या रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये कोविड वॉर्ड तयार करण्यात येऊन, शासन निर्देशानुसार ८० टक्के बेड राखीव करण्यात आले. कोरोना नियंत्रणासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात आली. तसेच, खासगी रुग्णालयातील बेडही आरक्षित करण्यात आले. सरकारी रुग्णालये तसेच महापालिका रुग्णालयांची एकूणच क्षमता बघता खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्यात आली. परंतू, आता नाशिकमधील कोरोना रुग्णसंख्याही आटोक्यात येत आहे. प्रशासनाने निर्बंधही शिथिल केले आहेत. महापालिकेची कोविड सेंटरही आता रिकामी झाली आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता सध्याची परिस्थिती हाताळणे सरकारी रुग्णालयांना शक्य आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील कोविड कक्ष बंद करण्याचा निर्णय हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.
'गरज पडल्यास पुन्हा सेवा देऊ'
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना आजाराला आटोक्यात आणण्यासाठी सर्व खाजगी हॉस्पिटल प्रयत्नशील आहेत. शासन स्तरावरून दिलेल्या सूचनांनुसार सर्व खासगी रुग्णालयांनी सेवा दिली. आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्याची रुग्णसंख्या पाहता शासकीय व निमशासकीय आरोग्य यंत्रणांना आरोग्यसेवा बजावणे सहज शक्य आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील कोविड कक्ष आता बंद करत आहोत. भविष्यात गरज पडल्यास पुन्हा सेवा देऊ असेही असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, सचिव डॉ. सचिन देवरे, उपाध्यक्ष डॉ. राज नगरकर आदी पदाधिकारी यांनी प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे.