नाशिक : देशभरात काल राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजांच्या अर्धांगिनी संयोगिता राजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. यानंतर तथाकथित महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्राचे पठण करू दिले नाही, अशी संयोगिता राजे छत्रपती यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. मात्र, आपण कुठल्याही प्रकारचा अपमान छत्रपती घराण्याचा केला नाही, असे महंत सुधीरदास पुजारी यांनी सांगितले.
अपमान केला नाही : काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत संयोगिता राजे छत्रपती यांच्या पोस्टवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, संयोगीताराजे छत्रपती या पावणेदोन महिन्यांपूर्वी काळाराम मंदिरात आल्या होत्या. त्या दोन दिवसांपूर्वी किंवा रामनवमीच्या दिवशी नाशिकला आल्या नव्हत्या. माझ्या बाजुने संयोगीता राजे छत्रपती यांच्या बाबत कुठलाही व्यक्ती दोष नाही. त्यांना असे वाटले असेल की मी ज्या पद्धतीने त्यांना सांगत होतो तर त्यांचा अपमान होत आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु अशा पद्धतीचा कुठलाही अपमान केलेला नाही. मी छत्रपती घराण्याचा अपमान केलेला नाही, असे महंत सुधीरदास पुजारी यांनी सांगितले आहे.
संयोगिता राजे छत्रपती यांची पोस्ट : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील बडव्यांवरून काही वर्षांपूर्वी जशी सर्वसामान्यांची नाराजी असायची तशीच परिस्थिती आता नाशिकच्या काळाराम मंदिरात बघायला मिळत आहे. आणि ही नाराजी छत्रपती संभाजीराजेंच्या अर्धांगिनी संयोगिता राजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे. मी नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात गेली असताना तेथील तथाकथित महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्रांचे पठण करून दिले नाही. छत्रपतींच्या घराण्याच्या वारसा लाभलेला असल्याने महतांच्या भूमिकेचा ठामपणे विरोध करू शकत आहे. ज्या मंदिरामध्ये आज आपण नियम लावत आहात, ती मंदिरे वाचवण्याचे काम कोणी केले ? असा सवाल त्यांनी केला आहे. छत्रपती संयोगिता राजे छत्रपतीराजेंच्या या पोस्टमुळे मोठ्या प्रमाणात श्री काळाराम मंदिरातील महंतांना ट्रोल केले जात आहे. विशेष म्हणजे या मुद्द्यावरून भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.
शाहू महाराजांचा वारसा : मुलांना आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसते. तसेच ईश्वराला भेटण्यासाठी आणि त्याच्या दर्शनासाठी तुमच्या मध्यस्थीची गरज नाही, असा थेट निशाणा संयोगिताराजे छत्रपती यांनी महंतांवर साधला. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सर्व समावेशक विचारांमुळेच अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांचा वैचारिक वारसा चालवण्याच्या जबाबदारीमुळेच आत्मबल प्राप्त झाले. त्यामुळे नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकले, असेही संयोगीता राजे छत्रपती यांनी म्हटले आहे.