नाशिक - पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांना नक्षलवाद्यांविरोधातील अतुलनीय कार्याबद्दल भारत सरकारचे शौर्य पदक जाहीर झाले आहे. 2017 ते 2019 कार्यकाळात गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात दाखवलेल्या पराक्रमामुळे त्यांना हे राष्ट्रपती पदक देण्यात येणार आहे. सध्या ते मनमाड येथे पोलीस उपाधिक्षक आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलामध्ये नक्षलविरोधी अभियानात त्यांना यश मिळाले होते. समीरसिंह साळवे यांनी नक्षलवाद्यांनी अबुजमाड जंगलामध्ये केलेला हल्ला परतवून लावला होता. त्यांनी सी-60 बटालियनमधील पोलिसांचे नेतृत्व केले होते. यासाठी त्यांना हे शौर्य पदक देण्यात येत आहे. या प्रकारचा पुरस्कार प्राप्त करणारे साळवे हे राज्यातील तिसरे पोलीस अधिकारी आहेत. यासंबंधी माहिती मिळताच त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.