नाशिक - शेतकऱ्यांच्या तसेच दिव्यांग व्यक्तींच्या रास्त मागण्यांसाठी, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा नेऊन जेलभरो आंदोलन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या आदेशानुसार राज्यात आंदोलन होत असताना नाशिकमध्ये देखील प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जेलभरो आंदोलन करण्यात आले.
राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास केला आहे. युतीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेतल्याने त्याचे पितळ उघडे पाडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
निराधार विधवा मातांना, भगिनींना वार्षिक दहा हजार भाऊबीज भेट द्यावी. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी, घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ दुष्काळी अनुदान द्यावे, आदिवासी वन जमिनी पट्टे त्वरित वाटप करावे, प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन मोबदला आणि नोकरी द्यावी, अशा मागण्यांचे फलक हाती घेऊन आंदोलनकर्त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.