मनमाड (नाशिक) - टाळेबंदी खुली झाल्यानंतर महावितरणने अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारणी करत मनमाडमधील ग्राहकांना शॉक दिला आहे. व्यवसाय बंद असताना एवढे बिल कसे भरायचे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. वाढीव वीज बिलाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा मनमाड शहर ग्राहक संघर्ष समितीने वीज कंपनीला दिला आहे.
कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात २२ मार्चला टाळेबंदी लागू केली. त्यामुळे अनेक उद्योगांसह व्यवसायांवर परिणाम झाला आहे. या काळात बंद असलेल्या व्यवसायिकांना पाच महिन्यानंतर महावितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारणी केली आहे. आधीच व्यवसायातून उत्पन्न नसताना भरमसाठ आलेले वीज बिल कसे भरायचे असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.
मनमाड शहर ग्राहक संघर्ष समितीकडून आंदोलनाचा इशारा
मनमाड शहर ग्राहक संघर्ष समितीचे संतोष बळीद यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीकडे विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. वाढीव वीजबिल त्वरित कमी करावे, अशी मागणी मनमाड शहर ग्राहक संघर्ष समितीने केली आहे. दोन किंवा तीन टप्प्यात वीज बील करून द्यावे, अशी मागणीही समितीने वीज कंपनीकडे केली आहे. याबाबत लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा समितीने वीज कंपनीला देण्यात आला आहे.
ग्राहक हाजी जहीर शेख म्हणाले, की आम्हाला दरमहा दीड ते दोन हजार रुपये वीज बिल येत होते. टाळेबंदीच्या काळातदेखील आम्ही नियमित वीज बिल भरले आहे. तरीही आम्हाला जवळपास 81 हजार रुपये वीज बिल आले आहे.
दरम्यान, वाढीव वीज बिल आलेल्या ग्राहकांना वायरमन घरी येऊन वीज मीटर तपासेल असे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच सध्याचे वीज बिल भरावेच लागेल, अशा स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत. एकंदरीत वीज ग्राहकांना वीज कंपनीच्या चुकीच्या नियोजनाने त्रास सहन करावा लागत आहे.