नाशिक - दिंडोरीच्या पश्चिम आदिवासी भागात अनेकांनी बँकांचे कर्ज काढून पोल्ट्री व्यवसाय सुरू केले आहेत. पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना खाद्य पोहोचत नसल्याने, उपासमारीने मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मरत आहेत. प्रशासनाने पशुखाद्य पोहोचवण्यासाठी परवानगी दिली असली, तरी वाहनधारक भीतीपोटी वाहतूक करण्यास धजावत नसल्याने, खाद्य मिळत नाही. त्याशिवाय संचारबंदीमुळे गेल्या पंचवीस दिवसांपासून कंपनीचे डॉक्टर पोल्ट्रीवर येत नाहीत. त्यामुळे अडचणीचा सामना कसा करावा, असा प्रश्न पोल्ट्री व्यासायिकांसमोर उभा राहिला आहे.
संपुर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून, गेल्या २२ मार्चपासून देशात संचारबंदी सुरू आहे. या परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. पोल्ट्री व्यसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पोल्ट्री फार्ममध्ये अंदाजे साडे सहा हजार कोंबड्या आहेत. साधारण ४७ दिवसाचे पक्षी आहेत. एवढ्या पक्षांना दररोज ११ क्विंटल खाद्य द्यावे लागते. मात्र खाद्य प्रमाण कमी असल्याने फक्त ५ गोण्या म्हणजे अडीच क्विंटल खाद्य द्यावे लागते. त्यामुळे वजनात मोठ्या प्रमाणावर घट झाली झाल्याची माहिती दिंडोरी तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक सदाशिव गावीत, निरंतर गांगोडे, महेंद्र गावीत यांनी दिली आहे.