नाशिक - शहरातील द्वारका येथील संत कबीर नगर परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख 8 हजार 464 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे पोलिसांची देखील मोठी डोकेदुखी वाढली आहे. भद्रकाली परिसरातील संत कबीर नगरमध्ये दिनेश कल्याणी हे देवदर्शनासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी घराजवळ राहणाऱ्या रईस शेख या चोरट्याने लोखंडी रॉडने घराची खिडकी तोडून प्रवेश केला आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला. दिनेश कल्याणी हे घरी आले असता सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ भद्रकाली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानंतर पोलीस तपास करीत होते. त्यांना संशयिताची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.