नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी काही हौशी पर्यटक या नियमांचं पालन करत नाहीत. अशा पर्यटकांवर आता पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. इगतपुरी पोलिसांनी या कारवाई अंतर्गत पर्यटकांकडून 35 हजारांचा दंड वसूल केला आहे.
नाशिक जिल्ह्यात पहिला पाऊस पडल्याने वातावरणात नवचैत्यन निर्माण झालं आहे. निर्सगाचे वरदान लाभलेल्या इगतपुरी तालुक्यात सर्वत्र हिरवाईची चादर पसरली असून, नैसर्गिक धबधबे देखील ओसंडून वाहत आहेत. नाशिक-मुंबई येथील पर्यटकांचे पावले आपोआप या ठिकाणांकडे वळत आहेत. भावली, वैतरणा, भंडारदरा या भागात पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली असून, अशा ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. इगतपुरी भागात ठिकठिकाणी अशा पर्यटस्थळावर जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आली असून, वाहनांवर पोलीस कारवाई करत आहेत. वेगवेगळ्या कारवाई अंतर्गत पोलिसांनी मागील 8 दिवसात 36 हजारांचा दंड वसूल केला आहे. 10 वाहनेदेखील जप्त केली आहेत.
पर्यटन स्थळावर नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळावर गर्दी करण्यास मनाई केली आहे. तरी काही पर्यटक अशा ठिकाणी येत आहेत. आम्ही त्यांच्यावर कारवाई करत आहोत. पर्यटन स्थळावर जाणाऱ्या रस्त्यावर आम्ही ठीक ठिकाणी बॅरिकेटिंग केली असून, वाहनांची तपासणी करत असल्याचे इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी सांगितले.