नाशिक- शहरातील प्रसिद्ध व्यावसायीक प्रितपालसिंह बलवीरसिंह यांच्या घरी चोरी झाली होती. यात चोरट्याने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पोलीस चौकशी झाल्यानंतर प्रीतपालसिंह यांच्या मोलकरणीने आपल्या साथीदारांसह ही चोरी केल्याचे समोर आले आहे.
चोरट्यांनी चक्क १८ लाख रुपयांची घरफोडी केली होती. झाले असे, की प्रसिद्ध व्यावसायिक प्रीतपालसिंग बालवीरसिंग बग्गा हे आपल्या कुटुंबियांसमवेत १६ नोव्हेंबरला अमृतसरला गेले होते. आपले मालक बाहेर गावी गेल्याची संधी साधून मोलकरीण दिपाली साठे हिने घरात असणाऱ्या रोख रक्कम आणि सोने चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याचे ठरवले. त्यानुसार तिने आपल्या शेजारी राहणाऱ्या जुनेद शेख आणि सोहेल अन्सारी यांची मदत घेत घरातील लॉकर्स खोलून दागिन्यांवर डल्ला मारला.
यादरम्यान बग्गा यांनी मोलकरणीला फोन करून विचारपूस देखील केली होती. मात्र, बग्गा कुटुंबीय २४ नोव्हेंबरला जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच भद्रकाली पोलीस ठाणे गाठून पोलिसांना झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना देखील सदर घटनेबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी आपली तपासचक्र फिरवत चौकशीसाठी मोलकरणीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच मोलकरणीने घरफोडीचे गुपित उघडे केले.
हेही वाचा- धक्कादायक..! नाशिकमध्ये मूकबधिर युवकावर लॉजमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार