नाशिक- शहरात महागड्या सायकल चोरणाऱ्या १३ वर्षीय अपल्वयीन मुलाला इंदिरा नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या सायकल चोरीच्या मागचे कारण ऐकूण पोलीसही थक्क झाले आहेत. मित्रांसोबत मौजमजा करता यावी यासाठी तो सायकल चोरायचा. ह्या मुलाकडून 8 सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मौजमजा करण्यासाठी सायकल चोरी
नाशिक मधील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील पंधरा दिवसापासून महागड्या सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. रोज सायकल चोरीच्या होणाऱ्या घटनांमुळे पोलीस देखील चक्रावून गेले होते. सायकल चोरीमागे एखादी टोळी असावी, असा अंदाज बांधून पोलिसांनी इंदिरा नगर भागात गस्त वाढवली होती. १५ दिवस होऊनसुद्धा आरोपी मिळत नसल्याने पोलिसांवर दबाव वाढला होता. अशात एका गुप्त बातमीवरून पोलिसांनी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी तब्यात घेतले तेव्हा त्याने दिलेल्या माहितीवरून पोलीस देखील अवाक झाले. मौजमजा करण्यासाठी सायकल चोरी करत असल्याची कबुली ह्या मुलाने दिली आहे. पोलिसांनी ह्या मुलाला ताब्यात घेतले असून त्याला बाल सुधारगृहात ठेवले जाणार आहे.
सायकल असोसिएशन कडून सत्कार
इंदिरा नगर भागात गेल्या काही दिवसांपासून सायकल चोरीच्या घटना घडत होत्या. मात्र, चोरी कोण करत आहे ह्याचा तपास लागत नव्हता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने संशयिताला ताब्यात घेऊन सायकल चोरीचा छडा लावला आहे. ही कामगीरी बजावणारे पोलीस हवालदार प्रभाकर पवार,दत्तात्रय गवारे,सौरभ माळी, यांचा सायकल असोसिएशनचे पदाधिकारी मनीषा रौदळ,रवींद्र दुसाने,साधना दुसाने,अवधुत कुलकर्णी यांनी सत्कार केला .