जळगाव - जिल्ह्यात गेल्या हंगामात कपाशीवरील बोंडअळीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळण्यात यश आले. परंतू यंदा कापूस हंगामात प्रारंभीच जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यंदा कपाशीचे उत्पादन चांगले येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, निम्म्या जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कृषी विभागाला दिसून आला आहे. विशेषत: जामनेर, धरणगाव, चोपडा, बोदवड, अमळनेर, एरंडोल, यावल, पारोळा अशा आठ तालुक्यांतील सुमारे दीड लाख हेक्टरवर बोंडअळीने नुकसान करण्यास सुरवात केली आहे.
जिल्ह्यात सुमारे सात लाख ३९ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. त्यातील सव्वापाच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. पैकी सव्वा ते दीड लाख हेक्टवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विभागाचे कृषी सहाय्यक आणि पर्यवेक्षकांनी शेतात जाऊन केलेल्या निरीक्षणात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. आतापासूनच शेतकऱ्यांनी बोंडअळीला नियंत्रणासाठी उपाय केल्यास आगामी काळात बोंडे खराब होऊन कपाशी वाया जाणार नसल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
हेही वाचा - वीज केंद्रात जमिनी गेल्या अन् नशिबी आला संघर्ष; अखेर प्रकल्पग्रस्तांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात कपाशीवर बोंडअळी आली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. सोबतच जिनिंग आणि प्रेसिंगलाही तोटा सहन करावा लागला होता. शेतकऱ्यांना बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची तुटपुंजी भरपाई मिळाली होती. यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्यात अनेक तालुक्यांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशीवर झाला आहे. शेतकऱ्यांनी तातडीने निंबोळी अर्काची फवारणी करावी. कामगंध सापळे, पक्षी थांबे लावावेत, आतापासूनच काळजी घ्यावी, कृषी विभागाशी तातडीने संपर्क साधून अधिक उपाय जाणून घ्यावेत. असे आवाहन कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले आहे.
हेही वाचा - भारतीय नौदलाने हिंदी महासागरात युद्धनौकांची संख्या वाढवली