येवला (नाशिक) - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा फटका आता येवल्यातील फोटोग्राफी व्यवसायला बसला आहे. उन्हाळ्यात असणारी लग्नसराई ही टाळेबंदीमुळे पूर्णपणे कोणत्याही कमाईविना निघून गेली. त्यामुळे आता अनेक छायाचित्रकार दुसऱ्या व्यवसायाकडे वळताना दिसत असून त्या माध्यमातून परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे.
छायाचित्रकार यांचा व्यवसाय लग्नसराईवर अवलंबून असतो. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून राज्यात असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व छायाचित्रकार व्यावसायिक घरीच बसून असल्याने कोणत्याही प्रकारचे फोटो काढण्यास कुढेही जाता येत नव्हते तर लॉकडाऊनमध्ये सर्व लग्न समारंभ बंद होते. सध्या लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने 50 लोकात लग्न लावून घेतले जात असल्याने यावेळी छायाचित्रकाराला ही बोलवण्यात येत नाही. स्टुडिओ उघडले असूनही कोरोनाच्या भीतीने फोटो काढण्यास कोणीही सध्या येत नाहीत.
प्रवीण डरांगे हे 28 वर्षापासून फोटोग्राफी करत आहेत. मात्र, लग्नसराई निघून गेलीय आता त्यांच्यावर बँकेचे कर्ज असून कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न प्रवीण डरांगे याना पडला व त्यांनी फळ विक्री करण्याचा निर्णय घेतला असून आता सध्या त्यांच्यावर फळ विक्री करण्याची वेळ आली आहे. काही तालुक्यातील व शहरातील छायाचित्रकार हे शेती, कापड दुकानात काम करून तर काही जण मास्क विक्री करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे छायाचित्रकार आता दुसऱ्या व्यवसायाकडे वळताना दिसत असून त्यामाध्यमातून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असून लॉकडाऊनचा फटका आता येवल्यातील छायाचित्रकार व्यावसायिकांना बसताना दिसत आहे.