नाशिक - मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांना भाजपने दिलेल्या उमेदवारीमुळे स्फोटात मृत्युमुखी पडलेल्याच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय तीला आजारी आहे म्हणून जामीन मिळाला आहे. तो जामीन आता रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका पिडीत कुटुंबाचे नातेवाईक निसार अहमद बिलाल यांनी न्यायालयात दाखल केली आहे.
प्रज्ञासिंह यांच्यावरील मकोका कायद्यांतर्गत झालेली कारवाई न्यायालयाने बरखास्त केली. मात्र, अन्य दहशतवादी विरोधी कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई चालूच आहे. न्यायालयाने साध्वीला अजूनही निर्दोष मुक्त केले नाही. कर्करोगावर आयुर्वेदिक उपचार घेता यावे, यासाठी न्यायालयातून तिला सुटका देण्यात आली. न्यायालयाने निर्दोष सुटका केली नसताना भाजपसारखा पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तिला उमेदवारी देत असेल, तर ही गंभीर बाब आहे, असे याचिकाकर्ता निसार अहेमद सय्यद बिलाल म्हणाले. मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी आजारपणाच्या सबबीवर जामीन मिळवला आहे. मग साध्वी आजारी असताना निवडणूक कशी काय लढवू शकते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
साध्वींच्या उमेदवारीविषयी मुस्लिम संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने पीडितांचा विचार न केल्यास मुस्लीम संघटना भोपाळमध्ये जाऊन आंदोलन करतील. एवढेच नाहीतर त्यांच्या विरोधात काम करण्याचा इशाराही मुस्लिम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. भाजपने प्रज्ञासिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन स्वतः मात्र राष्ट्रीय सुरक्षेची हेळसांड केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काय आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण -
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ ला बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास १०० जण जखमी झाले होते. विशेष म्हणजे या काळात रमजान असल्यामुळे लोक नमाज पठन करीत होते. त्यावेळी हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. यामागे काही हिंदुत्त्ववादी लोकांचा हात असल्याचे बोलले जात होता. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह ७ आरोपींना दोषी धरण्यात आले होते. त्यानंतर साध्वींसह काही जणांना जामीन देण्यात आला.