नाशिक - सटाणा शहरासाठी महत्वकांक्षी आणि कायमस्वरूपी पाणी टंचाई दूर करण्यासाठी पुनद धरणातून सटाणा शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या ५५ कोटी रूपयांच्या पुनद पाणीपुरवठा योजनेला न्यायालयाने दिलासा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी या योजनेचे पाईपलाईन टाकण्याच्या कामाला पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली होती. मात्र, यावेळी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले होते.
यावेळी, सटाणा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पूनद धरणातून होणारा पाणीपुरवठा हा पाईपलाईनद्वारे न करता कालव्याद्वारे करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी कळवण येथील सर्वपक्षीय नेते आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. तसेच यावेळी पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, शेतकरी एकजूटीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. हे काम थांबविण्याचा प्रयत्न केल्यामुळे कृती समितीचे अध्यक्ष देविदास पवार, नितीन पवार, महेंद्र अहिरे यांसह स्थानिक नेते, कृती समितीच्या सदस्यांसह ६० जणांना जणांना अभोना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले होते. त्यांना समज देऊन रात्री उशीरा सोडण्यात आले.
दरम्यान, या सर्व प्रकरणाचा कळवण तालुका आणि पूनद खोरे वासियांकडून तीव्र निषेध करण्यात आला. या योजनेला होणारा विरोध लक्षात घेता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. कळवण, देवळा तालुक्यातील शेतकरी आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.