नाशिक - पोटात दुखतं म्हणून रुग्णाच्या छातीचा एक्स रे, आणि कोरोनाची टेस्ट करत नाशिकच्या अशोका मेडिकव्हर रुग्णालयाकडून रुग्णाची लूट करण्यात आली, असा आरोप रुग्णाने केला असून याबाबत रुग्णाने थेट महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- 'बॉय्ज लॉकर रुम' कांड : एक ताब्यात, २२ जणांची ओळख पटवण्यात यश..
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात करण्यात आला असून नाशिकमधील बहुतांश रुग्णालयेदेखील कोरोनाच्या भीतीने बंद असल्याचे चित्र आहे. मात्र, अशा कठीण परिस्थितीत देखील काही रुग्णालये रुग्णांची आर्थिक लूट करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. नाशिकमधील नामांकित अशोक मेडिकव्हर रुग्णालयात पोट दुखतं म्हणून विनायक भास्कर यांनी 1 मे रोजी प्राथमिक तपासणी केली.
डॉक्टरांनी त्यांना तुम्ही रुग्णालयात दाखल व्हावे लागेल असे सांगितले. त्यांच्या पोटाची सोनोग्राफी करण्याची गरज असताना सिटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पाठीचा आणि छातीचा एक्सरे देखील काढण्यात आला. तसचे दुसऱ्या दिवशी त्यांना माहिती न देता त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. या तपासणीसाठी लागणाऱ्या पीपीई किट्ससाठी 7 हजार 500 हजार रुपये आकारण्यात आले. मात्र, चार दिवस होऊनही अद्याप कोरोनाचा अहवाल प्रलंबितच आहे. तर या चार दिवसात रुग्णालयाने 60 हजार रुपये बिल झाल्याचे सांगितले आहे.
रुग्णालय माझी आर्थिक लूट करीत असल्याचे म्हणत भास्कर यांनी थेट महानगरपालिका आरोग्य अधिकारी राजेंद्र त्र्यम्बके यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कोरोनामुळे एकीकडे सर्वसामान्य माणूस आर्थिक अडचणीत सापडला असताना, दुसरीकडे माणुसकी हरपलेली काही खासगी रुग्णालये सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लूट करीत आहेत.