नाशिक - येवला शहरातील मिल्लत नगर भागात रविवारी पहाटेच्या सुमारास रद्दी कागद गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊन जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुमारे ७ तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले.
येवला शहराच्या मिल्लत नगर भागात फळ पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या रद्दी कागदाच्या गोडाऊनला रविवारी पहाटे ३ च्या सुमारास आग लागली. यात लाखो रुपयांचा रद्दी कागद, पेपर कटिंग मशनरी, मोटर सायकल जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी येवला व मनमाड येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले असुन सुमारे ७ तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
शहरातील मिल्लत नगर भागात शेख शब्बीर अब्दुल गफूर घासी यांचे रद्दी कागद कटिंगचा उद्योग आहे. याठिकाणी उद्योगात वापरला जाणारा कागदाचा किस तयार केला जातो. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास रहिवाशांना मोठ्या स्फोटाचा आवाज आला. रात्री ३ वाजता कशाचा आवाज येत आहे हे पाहण्यासाठी ते बाहेर आले असता, त्यांना आग लागलेली दिसली. तिथे असलेल्या मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीला लागलेल्या आगीमुळे स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी रद्दी कागदाचा ज्वलनशील माल असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत सुमारे ७ ते ८ लाखांचे नुकसान झाले असून, रहिवासी भागात ज्वलनशील पदार्थांच्या गोडाऊनमुळे रहिवाशांची सुरक्षा धोक्यात आली असल्याची भावना व्यक्त होत आहे.