नाशिक - संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा गुरुवारी (24 जून) त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सलग दुसऱ्या वर्षी पालखी बसमधून पंढरपूरला जाणार आहे. वारकरी संप्रदायमध्ये अतिशय मानाची पालखी म्हणून या पालखीची ओळख आहे.
मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत रंगणार पालखी प्रस्थान सोहळा
संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा गुरुवारी त्रंबकेश्वरमध्ये पार पडणार आहे. यंदाही राज्यावर कोरोनाचा सावट आहे. त्यामुळे पायी वारीला सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिराच्या आवारातच पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वारकऱ्यांनीही दर्शनासाठी गर्दी करु नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
दोन बसमधून नाथ महाराजांची पालखी जाणार पंढरीला
दरवर्षी मोठ्या उत्साहात या दिवशी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने ही पायी वारी होणार नाही. त्यामुळे फक्त पालखी प्रस्थान सोहळा मंदिरात पार पडणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सरकारने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे दोन बसमध्ये नाथ महाराजांची पालखी पंढरपूरला नेण्यात येणार आहे. याची माहिती मंदिर समितीचे विश्वस्त भाऊसाहेब गंभीरे यांनी दिली आहे.
हेही वाचा - अॅलॉपॅथीवरून देशभरात गुन्हे दाखल झाल्याने रामदेव बाबांची सर्वोच्च न्यायालायत धाव