नाशिक - भाजपच्यावतीने करण्यात आलेल्या दूध आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार व दोन आमदारांवर ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिंडोरी लोकसभा खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे व आमदार राहुल ढिकले यांच्यावर हे गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय भाजपच्या पदाधिकाऱ्यांवही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
ओझर दहावा मैल याठिकाणी एक ऑगस्ट रोजी दूध दरवाढीसाठी भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांची पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली होती. तसेच वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.
गाईच्या दुधाला दहा रुपये प्रतिलीटर अनुदान मिळावे, तसेच गाईच्या भुकटीला पन्नास रुपये प्रति किलो अनुदान मिळावे याकरता राज्यभर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या भाजपच्या 9 पदाधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये परेश शहा, योगेश चौधरी, फेरूमल फुलवणी, सुखदेव चौरे, दीपक श्रीखंडे, नितीन जाधव, श्रीराम आढाव, कैलास आव्हाड, योगेश तिडके यांचा समावेश असल्याचे समजते. याप्रकरणी ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार यादव पुढील तपास करत आहेत.