नाशिक - नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर असलेले 61 रुग्ण अत्यवस्थ असून, यामधील 30 ते 35 रुग्ण दगावण्याची शक्यता असल्याचं शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे.
नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईपलाईनला बुधवारी साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. या घटनेने एकच खळबळ उडाली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन गळतीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळपास 30 मिनिटानंतर ऑक्सीजन गळती काही प्रमाणात कमी झाली. गंभीर बाब म्हणजे या रुग्णालयात 171 रुग्ण हे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर असून, ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने 61 रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
61 रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ
शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या घटनेनंतर रुग्णालयात जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी माहिती देताना म्हटले आहे की, ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने, 61 रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ झाली आहे. यातील 30 ते 35 रुग्ण दगावण्याची शक्यता आहे.
ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी धावपळ
दरम्यान या घटनेनंतर नवीन ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी रुग्णालय प्रशासन धावपळ करत असून, एक ऑक्सिजनचा टँकर मागवण्यात आला आहे. एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना, दुसरीकडे ऑक्सिजन गळतील जबाबदार कोण याबाबत चौकशीचे आदेश मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहे. दरम्यान या घटनेनंतर अनेक रुग्णांच्या नातेवाईंकानी आपले रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात हलवले आहेत.
हेही वाचा - 'सरकारशिवाय कोणालाही रेमडेसिवीर खरेदीचा अधिकार नाही'