येवला (नाशिक) - लाखो रुपयांची गुंतवणूक करून उभारलेल्या लॉन्स व मंगल कार्यालयांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्न समारंभ बंदी असल्याने लॉन्स मालकांना याचा फटका बसला आहे. नेहमीच बँड बाजाच्या गजरात हळदीचा समारंभ यापासून ते शुभविवाहपर्यंत जी मंगल कार्यालय गजबलेली असायची आज त्याच लॉन्समध्ये कांदा हा वऱ्हाडी बनवून विराजमान झाला असल्याचे चित्र येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील लॉन्स व मंगल कार्यालयात दिसत आहे.
वऱ्हाडीच्या जागी कांदा विराजमान...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉन्समधील लग्न समारंभबंदी असल्याने ऐन लग्न सराईत लॉन्स रिकामे असल्याने लॉन्समध्ये काम करणारे कारागीर व लॉन्सच्या मेंटनन्सचा खर्च कसा करावा, असा प्रश्न लॉन्स मालकांना पडला आहे. त्यामुळे लॉन्स मालकांनी कांदा साठवणीसाठी लॉन्स हे भाडे तत्वावर दिले आहे. त्यामुळे आता लॉन्समध्ये वऱ्हाच्या जागी आता कांदा विराजमान झालाचे चित्र सध्या येवल्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.
कांदा साठवणुकीकरिता लॉन्सचा आधार..
सतत कोसळणारे कांद्याचे भाव त्यामुळे शेतकरी आता कांदा साठवणुकीकडे वळला आहे. सध्या बाजार समितीत कांद्याला भाव मिळत नसल्याने उन्हाळ कांदा साठवणूक करताना शेतकरीवर्ग दिसून येत असून ज्यांना जागा नाही त्यांनी जे लॉन्स रिकामे आहेत. अशा लॉन्समध्येच कांदा साठवत असून त्या बदल्यात लॉन्स मालकाला भाडे देत आहे. मिळणाऱ्या भांड्यातून लॉन्स मधील कामगारांचा पगार देणे शक्य होत आहे. तरी ठराविक लोकांच्या उपस्थितीत लॉन्समधील लग्नाना परवानगी देण्याची मागणी होत आहे.