दिंडोरी ( नाशिक ) - दिंडोरी तालुक्यातील पश्चिम उत्तर पट्यात व पेठ तालुक्यातील शेतीला भाताचे आगार समजले जाते. परंतू यावर्षी पावसाने दोन महिन्यापासून दडी मारल्याने भात लावणी लांबली होती. कशीबशी भात लावणी केलेल्या भातावर आता करपा रोगाने थैमान घातल्याने दिंडोरीच्या पश्चिम भागात व पेठ तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पेठ पंचायत सभापती विलास अलबाड यांनी तालुक्यातील भात शेतीची पाहणी केली असता ऊशीराने लावणी केलेल्या भातावर पर्णकरपा सदृष्य रोग पडल्याचे दिसून आले. या वर्षी पावसाने ऐन खरीप लावणीत हुलकावणी दिल्याने नागली व वरई पुर्णपणे नष्ट झाली. तर इकडून तिकडून पाणी आणून लावणी केलेल्या भातावर आता करपाने हल्ला केल्याने संपूर्ण खरीप पिके नष्ट झाले असून शासनाने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जि.प. सदस्य भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड यांनी केली आहे. यावेळी तुळशिराम वाघमारे, रामदास वाघेरे, यादव भोये, दीलीप भोये यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.