नाशिक - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त काळजी असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर बोलत होते.
जिल्ह्यातील सटाणा, बागलाण ह्या तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ह्या नुकसानीची पाहणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी करत शेतकऱ्यांशी चर्चा केली. कृषिमंत्री दादा भुसे आणि पालकमंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे असून सुद्धा अद्याप त्यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली नसल्याचे म्हणत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत सरकारने करावी, असे दरेकर म्हणाले. शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झाला असून वीज पुरवठा तोडला जातोय अनेक शेतकऱ्यांनी शेती विकण्यास काढली असून सरकार फक्त घोषणा करत असून कृती करत नसल्याची टीका दरेकर यांनी केली.
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन प्रवीण दरेकर यांनी केले. सध्या काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत असून संजय राऊत यांना शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची काळजी अधिक असल्याचे म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची गरज नाही, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. मात्र, हीच भूमिका त्यांनी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याबाबत का दाखवली नाही, असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
कोरोना परिस्थिती विदारक
गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्याने नव्या रुग्णांना खाट उपलब्ध होत नाहीत. प्रशासनासोबत मी बैठक घेतली असून दोन दिवसात अधिक 200 व्हेंटिलेटर खाट उपलब्ध करतील, असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिल्याचे दरेकर यांनी सांगितले. लसीकरण जास्त होण्यासाठी केंद्राकडून अधिक लशीच्या मात्रा उपलब्ध करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सागितले.
कोरोना नियंत्रणात राखण्यात सरकार अपयशी असल्याचे मत व्यक्त करत राज्याचे मंत्री वेग-वेगळी विधाने करत आहेत. टाळेबंदी केली तर कामधंदे बंद पडतील आणि उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. समन्वय राखून परिस्थिती हाताळणे आवश्यक असल्याचे मत दरेकर यांनी व्यक्त केले. जिथे गरज आहे तिथेच टाळेबंदी करा, मात्र सरसकट संचारबंदी योग्य नाही, असेही दरेकर म्हणाले.
पोलिसांच्या मधील काही प्रवृत्ती चुकीच्या -
सर्व पोलीस वाईट नाहीत, त्यांच्यातील काही प्रवृत्ती चुकीच्या आहेत. नाशिकच्या पोलीस अकादमीत झालेल्या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक यांच्या सामूहिक नृत्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.