नाशिक - महानगरपालिकेची महासभा आणि गोंधळ हे नित्याची बाब झाली आहे. मात्र, यावेळी तांत्रिक अडचणीमुळे गोंधळ झाला. कोरोनामुळे महासभा ऑनलाईन पद्धतीने बोलाविण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे विरोधकांनी आजची महासभा रद्द करण्याची मागणी करत आयुक्तांच्या दालनात धडक दिली. विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे ही महासभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली.
नाशिक महानगरपालिकेची महासभा ही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. महापालिकेच्या महासभेत नेहमीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि वादविवाद बघायला मिळतात. आजचा महासभेतील गोंधळ हा विकासकामांच्या विषयावर नाही तर तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यापासून महापालिकेची महासभा ऑनलाईन पद्धतीने होत आहे. 29 मे रोजी पहिल्यांदाच महापालिकेची ऑनलाईन महासभा झाली होती. ही महासभादेखील सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामुळे चांगलीच गाजली होती. त्यानंतर आज झालेली महासभा देखील मोठ्या प्रमाणावर गाजली. महासभा सुरू असताना आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी थेट महापौरांच्या दालनात घुसून ऑनलाइन महासभा रद्द करण्यात यावी, यासाठी गोंधळ घातला.
नाशिक शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे अनेक विषय या महासभेत मांडण्यात आले. मात्र, त्यावर चर्चा न करता मंजूर करण्यात येणारे विषय आणि होणारी चर्चा यात काहीच तारतम्य नव्हते. महासभेतील मुद्देच कळत नसतील, तर महासभा घेऊन उपयोग काय? असा सवाल करत ही महासभा फक्त टक्केवारीसाठी घेण्यात आल्याचा आरोप मनपा विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते यांनी केला.
शहरात कोरोनाचा प्रदूर्भाव वाढत असताना त्याकडे लक्ष द्यायचे सोडून ऑनलाइन महासभा घेण्यात येत आहे. मात्र, या महासभेत विषय मांडल्यावर चर्चा न करताच विषयांना मंजुरी देण्यात येत असून हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांनी केला आहे.
महासभा विडिओ कॉन्फरन्सद्वारे होत असल्याने याला मर्यादा आहे. त्यामुळेच विषय मांडल्यानंतर सदस्यांचे थोडक्यात मत घेऊन विषयाला मंजुरी दिली जात असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी दिले आहे.
या सर्व गोंधळानंतर नाशिक महापालिकेची सभा पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.