नाशिक - कळवण शहरातील कळवण-देवळा रस्त्यावरील किसान ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्रातून 7 ऑक्टोबरच्या रात्री चक्क कांदा बियाण्याची चोरी करण्यात आली. याप्रकरणी चोरट्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा चोर धुळे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे.
गेल्या बुधवारी कळवण- देवळा रस्त्यावर गणेशनगर भागात असलेल्या अतुल रौंदळ यांच्या किसान ट्रेडर्स या कृषी दुकानात चोरी झाली होती. दुकानाच्या मागच्या बाजूचा पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश करून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे कांदा बियाणे आणि पाच हजार रुपये रोख रक्कम लंपास केली होती. या चोरीचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश निकम आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने धुळे जिल्ह्यातून भिका सदू भोई या आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी अधिक माहिती दिली. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून विविध पोलीस स्थानकांमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, मधुकर तारु, शिवाजी शिंदे, सुरेश पवार हे पुढील तपास करत आहेत.