मनमाड (नाशिक) - बाजार समितीत कांद्याचे लिलाव बेमुदत बंद राहणार आहेत. केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी असमर्थता दाखविली आहे. मात्र, त्याचा फटका शेतकऱ्यांना ऐन सणासुदीत बसत आहे.
कांद्याचे वाढते भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने विविध पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने कांद्यावरील आयात शुल्क माफ केले आहे. तर व्यापारी वर्गाने कांद्याची साठवणूक करू नये, म्हणून साठेबाजीवर निर्बंध घातले आहेत. व्यापारी वर्गाकडे आधीपासूनच कांदा शिल्लक आहे. त्यात निर्यातबंदी असल्याने दुसरा कांदा खरेदीसाठी व्यापाऱ्यांसमोर मोठी अडचण येत आहे. त्यामुळे मनमाड कृषि उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी वर्गाने आजपासून कांदा खरेदीसाठी बेमुदत बंद केला आहे.
शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी-
कांदा लिलाव बंद राहिल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत कांदा विक्रीतून शेतकऱ्याला चांगले पैसे मिळत होते. केंद्राने व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
व्यापाऱ्यांना प्राप्तिकर विभागाची धाड पडण्याची भीती-
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय सांगळे म्हणाले, की बाजार समित्याची कामे चालू आहेत. व्यापाऱ्यांना प्राप्तिकर विभागाची धाड पडण्याची भीती आहे. व्यापाऱ्यांनी घेतलेला तीन ते चार हजार टन कांद्याचा बाहेरगावीही पाठविलेला नाही. व्यापारी नसल्याने लिलाव बंद आहे. मात्र, प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी आर्थिक संकटात-
शेतकरी संदीप सानप म्हणाले, की शेतकऱ्यांना सणासुदीत कांद्याचे थोडेफार पैसे मिळाले असते. रब्बीच्या पिकासाठीही शेतकऱ्यांना भांडवल हवे आहे. त्यामुळे कांदे साठ्यावरील बंधन हटवून बाजार समितीचे कामकाज सुरू करावे, ही केंद्र सरकारला विनंती आहे.