दिंडोरी (नाशिक) - भारतात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक जिल्ह्याच्या मालेगावात रुग्णसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. या लॉकडाऊनचा सध्या तिसरा टप्पा सुरू आहे. लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा बंद आहेत. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठे संकटात सापडले आहेत. कांदा उत्पादनासाठी झालेला खर्च देखील यावर्षी निघाला नसल्याचे सांगताना कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. व्यापारी भाव पाडून चार ते पाच रुपये किलोने कांदा मागत आहेत, तर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला कांदा शेतातच पडून असल्याने मातीमोल भावात विकण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे शेतकरी यांनी सांगितले.
दिंडोरी तालुक्यात यावर्षी कांद्याचे चांगले पीक झाले होते. पिक जोरात आले मात्र, बाजारपेठा खुल्या नसल्यामुळे कांद्याचे पिक अद्याप शेतातच पडून आहे. व्यापारी भाव पाडून कांदा मागत आहेत. मात्र, शेतात पडलेला कांदा विकावा तर परवडत नाही आणि नाही विकावा तर पावसाचे दिवस जवळ आले आहे. त्यामुळे सगळा कांदा नासून जाईल, अशा द्विधा मनस्थितीत सध्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडकले आहेत. एवढा मोठा खर्च करून देखील आमच्या पदरात काहीच पडले नाही. असे सांगताना शासनाने कांदा उत्पादकांसाठी मदतीचा हात द्यावा, अशी मागणी कृष्णा वाघ या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.