नाशिक- जिल्ह्यातील 10 तालुक्यात 70 हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि वातावरण बदलामुळे गतवर्षीपेक्षा कमी क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांना परतीचा पाऊस, अवकाळी वातावरणातील सततचे बदल अशा अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागला आहे. दिवाळीपर्यत जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 69 हजार 909 हेक्टरवर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड पूर्ण झाल्याचे कृषी उप संचालक कैलास शिरसाठ यांनी सांगितले. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात टाकलेली रोपे 70 टक्क्यांपेक्षा जास्त खराब झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात बियाणे लागवडी टाकली आहेत. त्यामुळे यंदा कांद्याची लागवड उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याचे मत शेतकरीवर्गातून व्यक्त केले जात आहे. तर गेल्यावर्षी जिल्ह्यात 25 फेब्रुवारीपर्यंत 1 लाख 47 हजार 324 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड करण्यात आली होती.
हेही वाचा-कोरोनावर लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट कंपनीचा इतिहास
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत..
गेल्या वर्षी व यंदा कांद्याला चांगला बाजारभाव असल्यामुळे इतर पिकापेक्षा चार महिन्याच्या कांदा पिकांची लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोपे व बियाणे मिळेल त्या भावाने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला आहे. ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. परंतु शेतकऱ्यांना ढगाळ हवामानामुळे औषध फवारणी मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात. त्याचबरोबर बाजारात भाव मिळतो की नाही या विचाराने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागतो.
हेही वाचा-मोकळी भांडीच फार आवाज करतात; खासदार सुप्रिया सुळेंची विरोधकांवर टीका
बियाण्यांच्या भावामुळे उत्पादन खर्चात होणार दुप्पट वाढ
परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रोपवाटिकांचे नुकसान झाले. परिमाणी शेतकऱ्यांना चार ते पाच वेळेस रोप टाकून द्यावी लागली. त्यामुळे बाजारात कांदा बियाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नवीन कंपन्यांचे बियाणे बाजारात 5 ते 6 हजार रुपये प्रति किलोने शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बियाण्यामुळे दुप्पट वाढ होणार आहे.
यंदा दिवाळीपर्यंत उन्हाळ (खरीप) कांद्याची तालुकानिहाय लागवड (हेक्टरमध्ये)
मालेगाव -19175, सटाणा -7314, निफाड -610.75, सिन्नर- 1667.30, येवला -10851, चांदवड- 14112, नांदगाव -8853 , कळवण -545,
देवळा- 6611, दिंडोरी -159
दरम्यान, कांद्याचे भाव गेल्या तीन महिन्यांपासून वाढले आहेत. देशातील बाजारांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची आयात केली आहे.