नाशिक - मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कांदा सडायला सुरुवात झाल्यामुळे आता लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे.
काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. यातच आयकर विभागाच्या वतीने कांदा व्यापाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली. लासलगावसह विविध ठिकाणी कांदा लिलाव देखील बंद ठेवण्यात आले होते. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना आता पुन्हा एकदा परतीच्या पावसामुळे कांदा भिजल्याने चाळीतील कांदा सडायला सुरुवात झाली आहे.
नाशिक शहरासह निफाड, बागलाण देवळाली, चांदवड, कळवण यांसह विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामध्ये सटाण्यात 24 तासांत जवळपास 180 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आल्याने व्यापाऱ्यांच्या शेडमध्ये पाणी शिरून शेकडो क्विंटल कांदा भिजला.
सटाणा परिसरात होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील घरांमध्ये पाणी घुसून अनेकाचे संसार पाण्याखाली गेले. यात व्यापारी संकुलातील बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने कांद्याच्या अनेक शेडमध्ये पाणी भरले आहे. याचबरोबर तालुक्यातील मका, सोयाबीन, कापूस यांसारख्या अनेक पिकांना फटका बसला आहे.
आता शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.