नाशिक - लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. बुधवारी अचानक आयकर विभागाने प्रमुख कांदा व्यापाऱ्यांवर धाड टाकल्यामुळे गुरुवारी व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी देखील बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद असल्याने हजारो शेतकऱ्यांची गैरसोय झाली.
केंद्र शासनाने कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्यात बंदीची घोषणा केली आहे. तरीही कांद्याचे दर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने बुधवारी आयकर विभागाच्या वतीने लासलगावातील नऊ व पिंपळगाव येथील एका कांदा व्यापाऱ्याच्या आस्थापनेवर छापा टाकण्यात आला. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांनी लिलावाकडे पाठ फिरवत गुरुवारी लासलगाव बाजार समितीमधील कांदा लिलावावर बंदी घातली. तर, दुसऱ्या दिवशी हे लिलाव पूर्ववत होतील अशी आशा असताना मात्र शुक्रवारी देखील बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद होते. यामुळे हजारो शेतकऱ्यांची गैरसोय झाली.
आधीच बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बदलत्या हवामानामुळे तसेच परतीच्या पावसाने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागला आहे. अशातच दोन दिवसांपासून बाजार समितीत लिलाव बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकरी संघटनेने बाजार समिती प्रशासनालानिवेदन देऊन तातडीने लिलाव सुरू करण्याची मागणी केली असून हे लिलाव सुरू झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.