नाशिक -जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना व्हायरस सदृश रुग्ण दाखल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच ही व्यक्ती दुबईहून नाशिकला आली होती. अचानक या व्यक्तीला खोकला, ताप, डोके दुखणे आणि दम लागत असल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांना शहरातील महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णाला होणारा त्रास अधिक वाटू लागल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रूग्णाच्या थुंकीचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर रुग्णावर योग्य ते उपचार केले जातील. याआधी देखील नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात परदेशवारी करून आलेल्या तीन संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे अहवाल हे निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. एकूणच प्रशासन कोरोना व्हायरस बाबत गांभीर्याने घेत आहे.
परदेशातून परतलेल्या 22 जणांची नियमित तपासणी -
कोरोना व्हायरसचा प्रसार इतर देशातून होत असलेल्या अनुषंगाने परदेश दौऱ्यावर गेलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात परदेशातुन परतलेल्या प्रवाशांची माहिती आरोग्य विभागास देण्याचे आवाहन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.
ज्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत तेथील शहरातुन कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ शकतो. भारतात परत आलेल्या नागरिकांना लगेच काही त्रास होत नाही. मात्र, नंतर दोन-तीन दिवसांपासून ते 14 दिवसापर्यंत त्यांना ताप, खोकला, दम लागणे असा त्रास होत असल्यास रुग्णांचे वेळीच वर्गीकरण करणे गरजेचे आहे. नाशिक शहरात एका संशयित रुग्णावर जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात उपचार करण्यात येत आहे. परदेशातून परतलेल्या 22 नागरिकांची घरी जाऊन नियमित तपासणी केली जाते आहे. त्यासाठी परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन, आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
कशी घ्याल काळजी -
कोरोना विषाणूचा प्रसार हवेत होत नाही. कोरोना पीडित रुग्णाच्या नाकातील द्रवकन समोरच्या वस्तूवर पडतात. यानंतर सामान्य व्यक्तीचा हात त्याला लागला आणि तोच हात नाका-तोंडाला लागतात, त्यावेळी कोरोना विषाणूचे द्रवकण नकळत सामान्य माणसाच्या शरीरात जातात. याप्रकारे त्याचा प्रसार सामान्य नागरिकांमध्ये होतो. यासाठी नियमित स्वच्छ हात धुवावे, हस्तांदोलन करणे टाळावे, नाका-तोंडावर रुमाल ठेवावा, सामान्य नागरिकांनी मास्क लावण्याची गरज नाही. मात्र, ज्यांना सर्दी-खोकला आहे, अशा रुग्णांनी रुमाल अथवा मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.