नाशिक - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिकच्या कालिका मंदिर प्रशासनाने येत्या नवरात्रोत्सव काळात 100 रुपये शुल्क आकारून टोकन पद्धतीने दर्शनाचा निर्णय घेतला आहे. काही भाविकांकडून या शुल्क आकारणीबाबत विरोध होत आहे. प्रति भाविक शंभर रुपये दर्शनासाठी लागणार आहेत. या निर्णयावर मंदिर प्रशासन ठाम आहे. कोरोनामुळे मंदिर प्रशासनाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत, त्यामुळे भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
100 रुपये आकारणे अयोग्य, हिंदू संघटनांचा विरोध -
नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात शंभर रुपये घेऊन दर्शन करण्याच्या निर्णयाला आता हिंदू संघटना आणि हिंदू एकता आंदोलन यांनी विरोध केला असून हा निर्णय मागे घ्या अन्यथा नागरिकांचा मोठा उद्रेक होईल, असा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी दिला आहे.
हे ही वाचा -शाळा उघडणार, शिक्षकांच्या मनात आशेचा किरण! पण कोरोना काळात आली वाहनं चालवण्याची वेळ
राज्य शासनाने कोरोना महामारी नियमांमध्ये बदल करत नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच 7 ऑक्टोंबरपासून राज्यातील मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. योगायोगाने त्याच दिवसापासून नवरात्र सुरू होत असल्यामुळे नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिरात दर्शन कसे करावे, याबाबत शुक्रवारी मुंबई नाका पोलीस ठाणेमध्ये पोलीस प्रशासन आणि कालिका मंदिर व्यवस्थापन यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये 100 रुपये शुल्क आकारून नागरिकांना दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयाला नाशिक शहरातून तीव्र विरोध होत असून याबाबत हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी पोलीस प्रशासन आणि कालिका मंदिर देवस्थान यांना इशारा देताना म्हटले आहे, की श्री कालिका मंदिर दर्शनासाठी रुपये 100 आकारणे अयोग्य आहे. भाविकांवर अन्यायकारक आहे. हिंदु एकता आंदोलन पार्टी व तमाम हिंदुत्ववादी संघटनाचा तीव्र विरोध असून सशुल्क आकारणी करू नये. हिंदु भाविक कोरोनाचे नियम पाळत असताना हार, फुले, नारळ, कुंकू, पूजा साहित्यही मिळणार नाही हे अन्यायकारक आहे.
हे ही वाचा -Navratrotsav 2021: पारंपरिक येरले पद्धतीने मूर्ती झाकून अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता
महाराष्ट्र सरकारने कठोर नियम निर्बंध फक्त हिंदुसाठी लागू करत आहे. म्हणून मंदिर प्रशासन व पोलीस यांनी अतिरेक न करता भाविकांना दर्शन घेवू द्यावे, अन्याय करू नये कारण नागरिकांचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे.