नाशिक- जिल्हात कोरोनाचा कहर सुरुच असून गेल्या २४ तासांत ११९ कोरोनाबाधित आढळले आहेत. यात नाशिक शहरातील सर्वाधिक ४९,ग्रामीण भागातील ३६ तर मालेगावच्या ३३ नव्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे. यामुळे नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ११०१ तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २६३५ वर गेली आहे. शनिवारी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक शहरातील पाच तर मालेगावच्या एकाचा समावेश आहे.
नाशकात कोरोनाचा कहर अधिकच जीवघेणा ठरत आहे. शहराच्या प्रत्येक भागासह ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यातही कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
शनिवारी नाशिकरोड विभागातील धोंगडे मळा, गोसावीवाडी, जुन्या नाशकातील बागवानपुरा, काझीपुरा, नाईकवाडीपुरा, बुधवारपेठ, कोकणीपुरा, पिंझारघाट रोड, दुध बाजार, वडाळा चौक, द्वारका, दिपालीनगर, पखालरोड, नवीन नाशिक, पंचवटीतील मखमलाबाद गाव, पेठरोड, आरटीओ परिसर, हनुमानवाडी, फुलेनगर, अंबड लिंकरोड, सातपूर, जाधव संकुल, शरणपूररोड आदी भागात कोरोनाचे नवे ४९ रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिक शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ११०१ वर पोहोचला आहे. यापैकी ४७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर ५६९ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
देवळाली कॅम्प व ग्रामीण भागातील लहवित, जाखोरी, सिन्नर, जायखेडा, सायखेडा, चांदवड, कोपरगाव, आंबेदिंडोरी, पिंपळगाव बसवंत निळवंडी, निफाड आदी ग्रामीण भागात ३६ तर आणि मालेगावमध्ये कोरोनाचे ३३ रुग्ण आढळले आहेत.