नाशिक - जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर एका खासगी बस आणि गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रस्त्याने जाणाऱ्या एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चांदवडजवळ हा अपघात झाला आहे. दुर्घटनाग्रस्त बसमधून ७५ जण प्रवास करत होते. त्यांना किरकोळ इजा झाली आहे.
आग्रा महामार्गावरून मजुरांना घेऊन जाणारी खासगी बस चांदवडजवळ आली असता, बस आणि गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक लागली. या अपघातानंतर बस थेट महामार्गाच्या कडेला जाऊन उलटली. त्यामुळे बसमधील 75 मजुर किरकोळ जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास मोठ्याप्रमाणात पडलेल्या धुक्यामुळे हा अपघात झाला. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले असले तरी रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या पादचाऱ्याचा मात्र मृत्यू झाला. या अपघातामधील जखमींना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दोन टपऱ्या आणि एक टॅक्सी चक्काचूर-
या अपघामुळे खासगी बस रस्त्याच्या कडेला उलटल्याने तिच्या धडकेमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन टपऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच त्या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या एका टॅक्सीचेही नुकसान झाले आहे.