नाशिक - शोरूम फोडून मोबाईल पळविणाऱ्या चादर गँगचे नेपाळ आणि बांगलादेश कनेक्शन समोर आले आहे. देशभरात चोऱ्या आणि घरफोड्या करून ही चोरटी गँग चोरीचा माल उपरोक्त ठिकाणी विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. या गँगचा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागल्याने घटनेचा उलगडा झाला असून त्यांनी शहरात गेल्या वर्षी देखील एक गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
म्होरक्याच्या साथीदारांच्या शोधार्थ पोलिसांची विविध पथके बिहारसह अन्य राज्यांमध्ये तळ ठोकून आहेत. ते लवकरच हाती लागतील, असा विश्वास पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला आहे. गंगापूर रोडवरील एलिमेंट मोबाईल शोरूममध्ये चोरट्यांनी भल्या पहाटे हातसाफ केला होता. चोरट्यांनी दुकानातून ७३ लाख ४६ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. त्यात अॅप्पल कंपनीचे मोबाइल, घड्याळ व तत्सम विद्युत उपकरणांचा समावेश होता. या चोरीमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. याप्रकरणी योगेश अहिरे यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरीच्या पद्धतीवरून शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ च्या पथकाने बिहारमध्ये तळ ठोकला असता हा गुन्हा देशातील कुख्यात चादर गँगने केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या पथकाने बिहार राज्यातील मोतीहारा जिल्ह्यातील घोडसाहन येथून अजयकुमार मोहन साहा या टोळीच्या म्होरक्यास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान अजयकुमार याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपये किमतीचे अॅप्पल कंपनीचे ४ मोबाइल हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यात समीर उर्फ सेलुवा मुस्तफा दिवाण, सलमान उर्फ बेलुवा मुस्तफा दिवाण, रियाज उर्फ कैमुद्दीन मिया, नईम उर्फ मुन्ना दिवाण, नसरूद्दीन बेचल मिया, मुस्लीम तय्यब मिया यांच्यासह एकूण ७ आरोपी गुन्ह्यात सहभागी होते, अशी माहिती मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. शिवाय चोरी केलेले मोबाइल नेपाळ, बांगलादेश येथे ग्राहक शोधून त्यांना विक्री केले जातात, अशी माहितीही पोलीस चौकशीत समोर आली आहे.